साताक 50 कडून सहा पुरुष आणि सहा महिला फ्रँचायझींसह व्यावसायिक टेनिस-बॉल क्रिकेट लीगची घोषणा
वीरेंद्र सेहवाग यांची लीग कमिशनरपदी, तर मिताली राज यांची महिला लीग ॲम्बेसेडरपदी नियुक्ती; क्रिकेट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्वेही लीगशी जोडली
मुंबई : साताक स्पोर्ट्स इंडिया प्रा. लि.ने साताक 50 या व्यावसायिक टेनिस-बॉल क्रिकेट लीगची घोषणा केली आहे. उदयोन्मुख क्रिकेटपटूंना फ्रँचायझी-आधारित संरचित वातावरणात स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या लीगचा उद्देश आहे. सहा पुरुष आणि सहा महिला फ्रँचायझींचा समावेश असलेली ही स्पर्धा तळागाळातील प्रतिभेला संघटित क्रीडा व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच महिला क्रिकेटपटूंसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. या लीगची स्थापना विजय अरोरा यांनी केली असून उमा व्ही., सतीश माने, जितेश शाह आणि ललित शाह सह-संस्थापक आहेत.
विजय अरोरा यांनी स्थापन केलेली साताक 50 ही लीग वैशिष्ट्यपूर्ण 50-बॉल स्वरूपात आशादायी भारतीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रतिभावंतांना एकत्र आणेल. लीगच्या जाहीर करण्यात आलेल्या क्रीडा नेतृत्वामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांची लीग कमिशनर म्हणून आणि मिताली राज यांची महिला लीग ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेमध्ये इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू पॉल निक्सन यांची ओव्हरसीज कन्सल्टंट आणि ग्लोबल लीग कोच म्हणून, तसेच व्यंकटेश प्रसाद, व्यंकटपती राजू आणि वेदा कृष्णमूर्ती यांची लीग ॲम्बेसेडरशिप आणि प्रशिक्षकपदाशी संबंधित भूमिकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
तळागाळातील क्रिकेटपटूंसाठी व्यावसायिक मार्ग निर्माण करणे
भारतात टेनिस-बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. समुदायस्तरीय स्पर्धा, परिसरातील सामने आणि स्थानिक क्रीडा उपक्रमांमधून उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. लोकप्रियता असूनही या प्रकाराचा संघटित व्यावसायिक स्पर्धांशी तुलनेने मर्यादित संबंध आहे. औपचारिक निवड प्रक्रियेद्वारे खेळाडूंना तळागाळातील सहभागातून फ्रँचायझी-स्तरीय स्पर्धेपर्यंत प्रगती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत साताक 50 ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न करते.
लहान शहरे आणि समुदायांमधील प्रतिभा शोधण्यावर या उपक्रमाचा भर आहे. अशा ठिकाणी खेळाडूंमध्ये स्पर्धात्मक क्षमता असू शकते; मात्र त्यांना प्रस्थापित क्रिकेट अकादमी, व्यावसायिक प्रशिक्षण नेटवर्क किंवा व्यापक क्रीडा संपर्क उपलब्ध नसतो. देशव्यापी स्काउटिंग कार्यक्रमाद्वारे आयोजकांनी पात्र खेळाडूंना निवड समित्यांसमोर आपली क्षमता दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. निवड प्रक्रियेत केवळ पूर्वीच्या क्रीडा संलग्नतेवर अवलंबून न राहता स्पर्धेतील कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. स्थानिक क्रिकेट प्रतिभेला व्यावसायिक लीगच्या वातावरणाशी जोडून टेनिस-बॉल क्रिकेटची दृश्यमानता आणि संघटित स्पर्धांमधील सहभाग वाढवण्याचे साताक 50 चे उद्दिष्ट आहे.
सहा पुरुष आणि सहा महिला फ्रँचायझी
लीगचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय. प्रत्येक गटात सहा फ्रँचायझी असतील. या रचनेत महिला क्रिकेटला उपक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुरुषांच्या स्पर्धेबरोबरच महिला खेळाडूंना स्वतंत्र स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध होईल.
संरचित स्पर्धांमध्ये अधिक संधी उपलब्ध झाल्यास उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंना भेडसावणाऱ्या काही अडचणी दूर करण्यास मदत होऊ शकते, असे आयोजकांचे मत आहे. विशेषतः संघटित क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या मर्यादित संधी असलेल्या खेळाडूंना याचा लाभ होऊ शकतो. महिला स्पर्धेचा उद्देश सहभागी खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची, स्पर्धात्मक अनुभव मिळवण्याची आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी देणे हा आहे. महिलांचा सहभाग ही अतिरिक्त बाब न मानता साताक 50 च्या मुख्य फ्रँचायझी रचनेतच त्याचा समावेश करण्यात आला आहे. भौगोलिक स्थान किंवा यापूर्वीचा अनुभव काहीही असला तरी क्रिकेट ही सहज उपलब्ध होऊ शकणारी क्रीडा संधी आहे, असा दृष्टिकोन तरुण महिला आणि पुरुषांमध्ये निर्माण करण्याचाही या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
क्रिकेट क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या भूमिका
भारताचे माजी सलामीवीर आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त वीरेंद्र सेहवाग यांची लीग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पारंपरिक व्यावसायिक मार्गांबाहेर राहिलेल्या खेळाडूंसाठी संधी निर्माण करू पाहणाऱ्या या स्पर्धेला त्यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी क्रिकेटपटूचे मार्गदर्शन लाभेल.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि भारतातील सर्वाधिक मानाच्या महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या मिताली राज यांची महिला लीग ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महिला स्पर्धेला एक प्रमुख क्रीडा प्रतिनिधी लाभेल आणि महिलांच्या सहभागावर लीगने दिलेला भर अधिक ठळक होईल.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू पॉल निक्सन ओव्हरसीज कन्सल्टंट आणि ग्लोबल लीग कोच म्हणून काम पाहतील. त्यांच्या भूमिकेमुळे लीगच्या प्रशिक्षण आणि क्रीडा संरचनेत आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचा समावेश होईल.
व्यंकटेश प्रसाद यांची टीम ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर व्यंकटपती राजू पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. वेदा कृष्णमूर्ती यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे लीगचे प्रतिनिधित्व, प्रशिक्षण तसेच पुरुष आणि महिला संघांसाठीचा अनुभव एकत्र येतो. कार्यक्रमाच्या घोषणेनुसार या पदांची नियुक्ती करण्यात आली असून लीगच्या जाहीर रचनेत प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या स्पष्ट होतात.
15 राज्यांमध्ये देशव्यापी विनामूल्य चाचणी फेऱ्या
भारताच्या 15 राज्यांमध्ये खेळाडूंसाठी विनामूल्य चाचणी फेऱ्या (ट्रायल्स) आधीच आयोजित करण्यात आल्या असून त्या सध्या सुरू आहेत. त्यामुळे उदयोन्मुख क्रिकेटपटूंना लीगच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे. अमृतसर, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, भोपाळ, गुवाहाटी, चेन्नई आणि गोवा यांसह इतर शहरांमध्येही या चाचण्या होत आहेत.
विविध आर्थिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीतील खेळाडूंना सहभागी होता यावे, या दृष्टीने या चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. सहभाग विनामूल्य असल्यामुळे प्रस्थापित क्रीडा नेटवर्कपर्यंत पोहोच नसलेल्या खेळाड्यांसमोरील सुरुवातीचे आर्थिक अडथळे कमी होतात. नोंदणी केलेल्या सर्व खेळाडूंना विनामूल्य विमा संरक्षणही देण्यात आले आहे.
निवड प्रक्रियेत नोंदणी, छाननी, चाचण्या, मूल्यांकन आणि क्रमवारी यांचा समावेश आहे. या टप्प्यांतून पुढे जाणारे पात्र खेळाडू केंद्रीय खेळाडू समूहात (प्लेयर पूल) समाविष्ट होतील. त्यानंतर लीगच्या नियमांनुसार फ्रँचायझींकडून निवड केली जाईल. 18 ते 30 वर्षे वयोगटातील खेळाडू लीगच्या निवड निकषांच्या अधीन राहून सहभागी होण्यास पात्र आहेत. देशव्यापी चाचणी प्रक्रिया सुरू असून निवड आणि फ्रँचायझी प्रक्रियेबाबतची पुढील माहिती लीगच्या अधिकृत घोषणांद्वारे दिली जाईल.
वैशिष्ट्यपूर्ण 50-बॉल क्रिकेट स्वरूप
साताक 50 मध्ये प्रत्येक संघ एका डावात 50 वैध चेंडूंचा सामना करेल. त्यांचे प्रत्येकी पाच चेंडूंच्या 10 षटकांमध्ये विभाजन केले जाईल. पारंपरिक क्रिकेटमध्ये एका षटकात सहा वैध चेंडू असतात; मात्र या लीगच्या स्वरूपात एका षटकात पाच चेंडू असतील.
हे लहान स्वरूप आक्रमक क्रिकेट, जलद निर्णयक्षमता आणि संपूर्ण सामन्यात अधिक रणनीतिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. चेंडूंची संख्या मर्यादित असल्यामुळे फलंदाजांना आक्रमक धावा आणि विकेट टिकवून ठेवणे यामध्ये समतोल साधावा लागेल. तसेच गोलंदाज आणि कर्णधारांना खेळातील प्रतिकूल टप्प्यांमधून सावरण्यासाठी कमी संधी मिळतील.
या स्वरूपात संघांना क्षेत्ररचना, गोलंदाजीची संयोजने आणि फलंदाजीच्या रणनीतींबाबत प्रभावी निर्णय घ्यावे लागतील. उदयोन्मुख खेळाडूंना वेगवान वातावरणात आपली क्षमता दाखवण्याची संधी या स्पर्धेतून मिळेल. संघटित सांघिक खेळाची स्पर्धात्मक तत्त्वे कायम ठेवत टेनिस-बॉल क्रिकेटला स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात हे स्वरूप मदत करू शकते, असा आयोजकांचा विश्वास आहे.
प्रतिभा विकास आणि समावेशकतेसाठी विजय अरोरा यांचे दृष्टिकोन
या उपक्रमाबाबत बोलताना साताक 50 चे संस्थापक विजय अरोरा म्हणाले, “साताक 50 ची निर्मिती केवळ क्रिकेटच्या वेळापत्रकात आणखी एका लीगची भर घालण्यासाठी झालेली नाही. खेळाडू कुठून येतो याचा विचार न करता त्याची प्रतिभा शोधली जावी, विकसित केली जावी आणि त्याला ती दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावे, असे व्यासपीठ आम्हाला निर्माण करायचे आहे.”
प्रस्थापित क्रीडा व्यवस्थेबाहेर राहू शकणाऱ्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अरोरा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “महिलांना खेळाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे सर्वात मोठे ध्येय आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही मैदानावर आपले स्थान आहे, त्यांच्या प्रतिभेला ओळख मिळायला हवी आणि क्रिकेट त्यांच्यासाठी नव्या संधींची दारे उघडू शकते, असे वाटावे अशी आमची इच्छा आहे.”
महिलांचा सहभाग आणि तळागाळातील प्रतिभेचा शोध ही या स्पर्धेची दोन प्रमुख उद्दिष्टे असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कामगिरीच्या आधारे ओळख मिळवण्याची आणि व्यावसायिक पद्धतीने आयोजित वातावरणात स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचाही या लीगचा प्रयत्न आहे.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रतिभेला एकत्र आणणे
देशांतर्गत सहभागाबरोबरच साताक 50 आपल्या फ्रँचायझी रचनेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे विकसित होत असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. या उपक्रमामुळे सहभागी खेळाडूंना खेळण्याच्या विविध शैली, रणनीतीचे दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक अनुभवांची ओळख होण्याची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय सहभागामुळे स्पर्धेची क्रीडा क्षेत्रातील व्याप्ती वाढण्याबरोबरच तळागाळातील क्रिकेट समुदायांमध्ये संबंध निर्माण होण्यासही मदत होईल. देशांतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्यास खेळाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अतिरिक्त अनुभव मिळू शकतो. समुदायस्तरीय सहभाग आणि संरचित स्पर्धात्मक संधी यांना जोडणारे व्यासपीठ म्हणून आयोजक या लीगकडे पाहतात.
पुढील वाटचाल
भारतात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट प्रकाराभोवती व्यावसायिक चौकट निर्माण करण्याचा साताक 50 हा प्रयत्न आहे. देशव्यापी स्काउटिंग, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र फ्रँचायझी, आंतरराष्ट्रीय सहभाग आणि वैशिष्ट्यपूर्ण 50-बॉल स्पर्धा यांचा या रचनेत समावेश आहे.
लीगचा पहिला हंगाम 2027 मध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. फ्रँचायझींची ओळख, खेळाडूंचा सहभाग, ठिकाणे आणि सामन्यांचे वेळापत्रक याबाबतच्या पुढील घोषणा आयोजकांकडून केल्या जातील. तळागाळातील प्रतिभेची ओळख आणि महिलांचा सहभाग यांना एकाच व्यावसायिक चौकटीत स्थान देऊन उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी अधिक संधी निर्माण करणे आणि भारतातील टेनिस-बॉल क्रिकेटच्या स्पर्धात्मक क्षेत्राचा विस्तार करणे हे साताक 50 चे उद्दिष्ट आहे.
साताक 50 विषयी
साताक 50 ही व्यावसायिक टेनिस-बॉल क्रिकेट लीग असून त्यात एकूण 12 फ्रँचायझी आहेत. त्यामध्ये सहा पुरुष आणि सहा महिला संघांचा समावेश आहे. प्रत्येक डावात प्रत्येकी पाच वैध चेंडूंची 10 षटके असतात, म्हणजेच प्रत्येक संघाला एकूण 50 वैध चेंडूंचा सामना करावा लागतो. विजय अरोरा यांनी स्थापन केलेल्या या लीगचे सह-संस्थापक उमा व्ही., सतीश माने, जितेश शाह आणि ललित शाह आहेत. या लीगचे प्रमोशन साताक स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून केले जाते.